Friday, January 16, 2009

पेशी ..

मी एकमेव मी एकाकी

मी एकसंध मी एकबंध

मी एक कण मी एक क्षण

मी एक रूप मी एकरूप

मी एक केन्द्र मी एक मध्य

मी एक बिंदु मी एक विश्व

मी एक श्वास मी एक पाश

मी एक पेशी मी लाखो विश्वांच्या राशी

पृथा ..

art by prasanna

मी चिंतातुर



मणामणाचे ओझे माझ्या या माथ्यावर
रणागणाचे युद्ध जणू या कुरुक्षेत्रावर
मी चिंतातुर

अखिल जगाचे दडपण माझ्या या मनावर
ना कशाची पर्वा ना परिणाम या जनावर
मी चिंतातुर

इथे असा मी समाधिस्थ मी केव्हापासून
झगडत बसतो 'मी' प्रत्येकाच्या मनामनातुन
मी चिंतातुर

कुपामंडूक मी ना यातून बाहेर पडणार
मुक्तही झालो तरी स्वातंत्र्याशी लड़णार

मी चिंतातुर होतो
मी चिंतातुर आहे
मी चिंतातुर असणार

पृथा..
art by prasanna

आता जाणवताहेत...


न जाणे कित्येक वर्षे .....
मी असा आतमध्ये
हे विश्व घेउन जगतोय
माझ्याही नकळत
पुटावर पुट चढ़ताहेत
आवरणाची
प्रावरणाची
हव्या असणा-या अन नसणा-याही
विचारांची ....
मी मात्र मग्न , हरवलेला...
भौतिकतेतच..

पण जेंव्हा आता
अचानक दिसतेय प्रतिमा
त्या शुन्यतेची
तसा उलगडत चाललोय मी
मला स्वतःला..
रेशमाच्या अलगद लडीसारखा
आता जाणवताहेत
त्या वळकटया
सा-या विश्वाच्या ..
त्या शुन्य जगाच्या
माझ्याच विचारांच्या..
आता जाणवताहेत...

पृथा...
art by prasanna

श्रावण...


श्रावणसर रिमझिम
अंगभर झिमझिम
माहेराची आठवण
थेंब थेंब....

तळहाती सुगंध
मेंदीचा दरवळे
केसातून धुपाचा
घम घम...

परडी फुलांची
ताट पूजेचे
नवीकोरी साडी
चम् चम्॥

व्रत वैकल्य
उपास तापास
आयुष्यमान भव
जिवलग॥

स्रुष्टिचं न्हाण
धरेचे गा-हाण
निसर्गस्तोत्र गाण
गुण गुण॥

पृथा..